जळगावशैक्षणिक

शिक्षणशास्त्र महाविद्यालय हिंदी दिवस उत्साहात साजरा

जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हिंदी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध साहित्यिक परंपरा तसेच विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी हिंदी विभागातील प्राध्यापक, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे श्री. राजेंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना हिंदी भाषेचे राष्ट्रीय व सामाजिक जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. हिंदी ही केवळ संवादाचे माध्यम नसून विविध भाषा, संस्कृती व प्रदेशांना जोडणारी महत्त्वाची भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात हिंदीचा अधिकाधिक वापर करावा तसेच हिंदी साहित्याचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी अमित मंडपे यांनी हिंदी भाषेच्या ऐतिहासिक महत्त्वावर उत्स्फूर्त भाषण केले.

हिंदी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व, कविता वाचन आणि हिंदी भाषण आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मार्कड यांनी केले, तर देवेंद्र सावकारे यांनी आभार मानले. डॉ. नारायण खडके यांच्या प्रेरणेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता वानखेडे, डॉ. जयश्री पाटील, सहाय्यक प्राध्यापक सुवर्ण अहिरे, सहाय्यक प्राध्यापक निधी शर्मा, श्री. पंकज वाघ, श्री. अरविंद पवार, श्री. चंद्रकांत सपकाळे तसेच द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button