
मेहरूण – विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता व मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत विकास परिषद, जळगाव शाखेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन सप्रेम भेट देण्यात आले.
विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनींना गरजेच्या वेळी शाळेतच सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध व्हावेत, या हेतूने मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांनी भारत विकास परिषदेकडे विनंती केली होती. त्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत परिषदेने विद्यालयाला हे व्हेंडिंग मशीन प्रदान केले.
या प्रसंगी भारत विकास परिषद, जळगाव शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने, सचिव भूषण गुरव, प्रांत सेवा गतिविधी प्रमुख डॉ. सुरेश अग्रवाल, ज्ञानेश्वर पाटील, गायत्री कुलकर्णी, कविता कोटस्थाने, डॉ. विकास चौधरी, जयेश वाल्हे, विशाल चोरडिया, डॉ. योगेश पाटील व विद्याधर केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात विद्यालयातील श्रीमती शितल कोळी, साधना शिरसाट, सरला पाटील, रूपाली आव्हाड, सोनाली चौधरी, कल्याणी महाजन आणि शारदा तडवी या शिक्षिकांसह शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मशीनमुळे विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात कोणताही संकोच न बाळगता आवश्यक सुविधा शाळेतच उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाला बळ मिळणार आहे. हा उपक्रम विद्यार्थिनींच्या आरोग्यदायी व सुरक्षित शालेय वातावरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यालयाच्या वतीने भारत विकास परिषद, जळगाव शाखेचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. समाजोपयोगी कार्यातून शिक्षण क्षेत्राला दिलेल्या या मोलाच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.






