

जळगाव (प्रतिनिधी): सूर्यजीवनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव व झाल्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा MPSC/UPSC अभ्यासिका दालनाचे भव्य उद्घाटन आज दिनांक ५ ऑक्टोबर २०२५, रविवार रोजी प्रसिद्ध उद्योगपती आयु. संजय इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सूर्यजीवनी संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुनील जाधव यांनी संजय इंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर इंगळेंच्या हस्ते नव्याने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिका दालनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी संजय इंगळे यांनी उपस्थित विद्यार्थी व तरुणांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी स्पर्धा परीक्षांमधील नियोजन, सातत्य आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करत, “अशा सुविधा ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देतात,” असे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या उद्दिष्टांचा परिचय करून दिला व भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही सुविधा पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन खजिनदार सुकदेव तायडे यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे संचालक मिलिंद सपकाळे, भीमराव अडकमोल, उमेश कांबळे, अजित भालेराव तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामदास कॉलनी, झिनिया बिल्डिंग, हॉटेल रॉयल पॅलेसच्या पश्चिमेस असलेली ही ‘सूर्यजीवनी अभ्यासिका’ १०८ विद्यार्थ्यांच्या आसन क्षमतेसह, आधुनिक सुविधा, वाचन व अभ्यासासाठी उत्कृष्ट वातावरण अशा सर्व सोयींनी सुसज्ज आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओम राजपूत यांचे विशेष सहकार्य लाभले.




