
जळगाव : सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित सद्गुरू शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील बी.एड. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यार्थी उद्बोधन वर्ग व स्वागत कार्यक्रमाचे (Student Orientation Program) आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील होत्या, तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. अनिता वानखेडे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बी.एड. अभ्यासक्रमाची रचना, विविध विषयांचे स्वरूप, अध्यापन पद्धती, प्रात्यक्षिक कार्य तसेच भावी शिक्षक म्हणून आवश्यक असलेल्या व्यावसायिक कौशल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी बी.एड. प्रथम वर्षातील विविध विषयांबाबत विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. बाल्यावस्थेतील अध्ययन, अध्यापन आणि विकास या विषयाचे मार्गदर्शन डॉ. अनिता वानखेडे यांनी केले. समकालीन भारतातील शिक्षण, लिंगभाव, शाळा आणि समाज या विषयावर डॉ. जयश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले. भाषा, ज्ञान आणि अभ्यासक्रम या विषयाची माहिती डॉ. प्रतिभा पाटील यांनी दिली. आरोग्य, योग आणि शारीरिक शिक्षण या विषयावर प्रा. सुवर्णा अहिरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच EPC-1 आणि EPC-2 या विषयांची माहिती प्रा. निधी शर्मा यांनी दिली. महाविद्यालयाच्या ग्रंथालयाविषयी श्री. पंकज वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पनांचे आकलन, प्रभावी अध्यापन कौशल्ये, आरोग्यविषयक जाणीव आणि शिक्षक व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक क्षमतांची माहिती देण्यात आली.
नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरणाशी परिचित करून देणे, अभ्यासक्रमाविषयी स्पष्टता निर्माण करणे आणि शिक्षक प्रशिक्षणाच्या प्रवासासाठी त्यांना सक्षम बनविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीची दिशा निश्चित करण्यास निश्चितच मदत होणार आहे.






