राज्यसामाजिक

“ज्याच्या हातात संविधान आणि पेन – तोच खरा राजा!” – प्रा. नामदेवराव जाधव

पुणे, ४ मे २०२५ – ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या वतीने आयोजित माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४(१)(ख) संदर्भातील विशेष ऑफलाइन प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. बाळासाहेब ठाकरे सभागृह, स्वारगेट येथे झालेल्या या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कलम ४(१)(ख) हे शासकीय कार्यालयांचा आरसा असून, सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी आपल्याकडील माहिती स्व-प्रेरणेने नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. या महत्त्वपूर्ण कलमातील १७ मुद्द्यांचे सखोल आणि स्पष्ट मार्गदर्शन ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. अब्राहम आढाव यांनी केले. त्यांच्या सादरीकरणाने प्रशिक्षणार्थींना व्यवहारातील माहिती अधिकाराचे सामर्थ्य समजून घेता आले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते – सुप्रसिद्ध समाजचिंतक आणि संविधान अभ्यासक प्रा. नामदेवराव जाधव. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी भाषणात सांगितले, “प्रत्येकाने संविधान वाचले पाहिजे; ही काळाची गरज आहे. आपल्या हातात बाबासाहेबांचे संविधान आणि पेन असेल, तर आपण खऱ्या अर्थाने राजा आहोत. भ्रष्ट व्यवस्थेला घाबरू नका – जनतेच्या हक्कासाठी लढा.”

प्रा. जाधव यांनी यावेळी नागरिकांना माहिती अधिकाराचा सक्रिय वापर करून समाजातील अन्यायाला विरोध करण्याचे आवाहन केले. “भारतीय संविधानाने आपल्याला हक्क, अधिकार आणि कर्तव्य दिले आहेत – त्यांचा वापर करत आपण ‘जिवंत संविधान’ बनूया,” असेही ते ठामपणे म्हणाले.

कार्यक्रमाच्या सांगत प्रा. जाधव यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारोप राष्ट्रगीताने झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button