जळगावसामाजिक

सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांचा प्रतिष्ठेचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता सुनील ताठे यांना प्रदान करण्यात आला. हा वितरण सोहळा १७ मार्च रोजी मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पाटकर दीक्षांत सभागृहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव उपस्थित होत्या.

स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सबलीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील सहा महसुली विभागांतून निवडलेल्या ११ महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक विभागातून २०२३-२४ या वर्षाचा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील निवेदिता ताठे यांना मिळाला.

पुरस्काराचे स्वरूप सावित्रीबाई फुले यांची मूर्ती, शाल, श्रीफळ आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे होते. निवेदिता ताठे या स्त्री भ्रूणहत्या रोखणे, सर्व शिक्षा अभियान, महिला सबलीकरण, बालविवाह प्रतिबंध तसेच अत्याचारग्रस्त महिलांना मार्गदर्शन व समुपदेशन अशा विविध सामाजिक क्षेत्रांत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान, या पुरस्कारानंतर जळगाव जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांकडून निवेदिता ताठे यांचा सत्कार करण्यात येत आहे. कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button