जळगावसामाजिक

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात

जळगाव : मू. जे. महाविद्यालय, जळगाव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती तथा ‘अंत्योदय दिवस’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. राजश्री महाजन यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रा. उमेश पाटील, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी तसेच महाविद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश महाजन यांनी केले. त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनप्रवासाची माहिती देताना राष्ट्र व समाजासाठीच्या त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी मांडलेल्या ‘एकात्म मानववाद’ या विचारसरणीची माहिती देत मानवी विकास हा केवळ आर्थिक किंवा राजकीय प्रगतीपुरता मर्यादित न राहता शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा सर्व अंगांनी व्हावा, हा त्यांच्या विचारांचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले.

यावेळी समाजातील शेवटच्या व गरजू व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचविणाऱ्या ‘अंत्योदय’ संकल्पनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही, हा विचार अधोरेखित करण्यात आला.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे साधे जीवन, समाजसेवा आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली बांधिलकी आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांच्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. एस. के. वानखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button