
जळगाव, दि. १३ मार्च – जळगाव जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय गॅस सिलेंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गंभीर अडचणीत सापडला असल्याची माहिती जळगाव हॉटेल अँड टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशनने दिली आहे. याबाबत संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे काही ठिकाणी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असला तरी महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे गॅसवर अवलंबून असल्याने जळगाव जिल्ह्यातील अनेक हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल व्यवसाय करणे कठीण होत असून काही ठिकाणी व्यवसाय बंद करण्याची वेळ येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना नियमित व सुरळीत व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदन देतांना संघटनेचे अध्यक्ष लेखराज उपाध्याय, उपाध्यक्ष ललित पाटील, सचिव संजय जगताप यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.






