

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा फुलेंच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक मुकेश नाईक म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेंचा इतिहास नेहमीच डोळ्यासमोर ठेवावा. आपल्याला शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी किती यातना सोसल्या आहेत याची जाणीव शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमीच करून द्यावी. शिक्षण खूप महत्त्वाचे आहे आणि प्रत्येकाला शिक्षण हे मिळालेच पाहिजे म्हणून महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. महात्मा फुलेंनी ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या माध्यमातून शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, असा महत्त्वाचा संदेश दिला आहे.या वेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




