

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये इको क्लब मार्फत जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरणाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेच्या परिसरामध्ये रस्त्याच्या लगत तसेच रस्त्या दुभाजका मध्ये झाडांना पाणी मिळत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष वाळून जात आहे. याची दखल घेऊन व ऊन्हाचा तडाका लक्षात घेता तातडीने या झाडांना पाणी देणे आवश्यक आहे. म्हणून जागतिक वसुंधरा दिनाचे निमित्त साधून परिसरातील झाडांना शाळेतील विद्यार्थ्यांकडून पाणी टाकण्यात आले. झाडांना पाणी देण्याचे मार्गदर्शक तत्त्वे विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून सांगण्यात आले .आपल्या परिसरातील वृक्षांना खाली प्लास्टिकच्या बाटली मार्फत पाणी कसे टाकावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश रुजविण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा प्रत्यक्षात वृक्षारोपण केले पाहिजे अशी अपेक्षा शाळेचे मुख्याध्यापक श्री मुकेश नाईक यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात शैक्षणिक सहलींना गेल्यावर रस्त्याच्या दुतर्फा पेरण्यासाठी शिक्षकांना शाळेमधील सीड बँकेच्या मार्फत वेगवेगळ्या झाडांच्या बिया देण्यात आल्या. मानवी हस्तक्षेपामुळे झालेली पर्यावरणाची हानी आपणच भरून काढली पाहिजे व प्राण्यांच्या प्रजाती टिकवल्या पाहिजेत असे आवाहन उज्वला नन्नवरे मॅडम यांनी केले.




