

वडगावशेरी (पुणे) — पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या वडगावशेरीत नागरिकांना वाहतुकीदरम्यान मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. परिसरातील रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत होते.
ही गंभीर समस्या सामाजिक कार्यकर्ते अब्राहम आढाव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचा निर्णय घेतला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 (RTS Act 2015) अंतर्गत त्यांनी १ एप्रिल २०२५ रोजी पुणे महानगरपालिकेकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची अधिकृत मागणी अर्जाद्वारे केली.
आरटीएस अंतर्गत निश्चित वेळेत सेवा न मिळाल्यामुळे अब्राहम आढाव यांनी प्रथम अपील दाखल केले. अपील केल्यानंतर संबंधित उपयुक्त संजय पोळ सर यांनी त्वरीत कारवाईचा आदेश दिला. डांबरीकरणासाठी डांबर उपलब्ध होण्यात थोडा विलंब झाला तरी, रामवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे उपयुक्त संजय पोळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली डांबर गाडी, रोलर आणि कामगारांची टीम तातडीने पाठवण्यात आली.
२६ एप्रिल २०२५ रोजी, स्वस्तिक बिल्डिंग मनोहर सोसायटी ते पुण्यनगरी मार्गावरील एकूण १६ खड्डे पूर्णपणे बुजवले गेले. सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक शिवा तांबे सर यांनी या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत अब्राहम आढाव यांचे विशेष आभार मानले आहेत. नागरिकांनीही आनंद व्यक्त करत म्हटले की, “लोकप्रतिनिधी नगरसेवक नसुनही आरटीएससारख्या कायद्याचा वापर करून आमच्या समस्या सोडवल्या गेल्या, याबद्दल आम्ही ऋणी आहोत.”
अब्राहम आढाव यांनी सांगितले की, “आरटीएस ऍक्टचा प्रभावी वापर करून संपूर्ण वडगावशेरी क्षेत्र खड्डेमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे.”
आरटीएस ऍक्ट 2015 चे महत्त्व:
सेवा मिळण्यासाठी ठराविक कालमर्यादा
सेवा न दिल्यास अपीलचा अधिकार
अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद
या लढ्यामुळे आरटीएस ऍक्टचा प्रभाव आणि नागरिकांना मिळणारे अधिकार पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.




