राज्यप्रशासकीय

सेवा हक्क दिन उत्साहात साजरा — “आपले आयुष्य नागरिकांच्या सेवेसाठीच” : पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांचे प्रतिपादन

पुणे, 29 एप्रिल 2025 — महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज खराडी पोलीस स्टेशन येथे सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण सर यांनी नागरिकांना वेळीच व प्रभावी सेवा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “आपले आयुष्य हे नागरिकांच्या सेवेसाठीच अर्पण करायचे आहे. लोकांच्या समस्या वेळेत सोडवणे हेच आमचे खरे कर्तव्य आहे,” असे त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले. चव्हाण सर पुढे म्हणाले, “शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू करून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवेसाठी एक मजबूत कायदेशीर चौकट दिली आहे. जर आपण वेळेत सेवा दिली तर नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि त्यांचा शासकीय यंत्रणांवरील विश्वास वृद्धिंगत होईल.”

कार्यक्रमात निर्माता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अब्राहम आढाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या सखोल मार्गदर्शनातून अधिनियमातील कलमे, उद्देशिका, धोरणे आणि कायद्याचे महत्व यांची सविस्तर माहिती दिली. “प्रत्येक नागरिक हा या लोकशाहीत राजा आहे आणि शासकीय कार्यालयांकडून सेवा घेणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे,” असे आढाव यांनी ठामपणे सांगितले. हा कार्यक्रम केवळ एक औपचारिकता न राहता, सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव ठरला. लोकसेवेच्या बांधिलकीची जाणीव अधिक दृढ करण्याचा निर्धार यानिमित्ताने उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. अशा उपक्रमांमुळे शासकीय यंत्रणांमधील उत्तरदायित्व वाढून नागरिकांचा विश्वास अधिक बळकट होतो, हे या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button