जळगावसामाजिक

महानगरपालिकेच्या वाहन विभागातील निष्काळजीपणामुळे नागरी सेवांवर परिणाम — माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांचे आयुक्तांना निवेदन

जळगाव | २५ जून २०२५

जळगाव शहरातील स्वच्छता, कचरा संकलन, नालेसफाई, धूळदाणे फवारणी यांसारख्या अत्यावश्यक नागरी सेवा पुरवण्यासाठी महानगरपालिकेकडे असलेली वाहने आणि मनुष्यबळ हे महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, या विभागात मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा आणि अकार्यक्षमता असल्याची गंभीर बाब माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांनी आयुक्तांकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे अधोरेखित केली आहे.

प्रशांत नाईक यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सद्यस्थितीत जळगाव महानगरपालिकेच्या वाहन विभागातील बहुतांश वाहने निकामी अवस्थेत पडून आहेत. सध्या केवळ ४ ते ५ वाहने कार्यरत असून उर्वरित वाहने कामाच्या बाहेर आहेत. ही वाहने महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या आवारात पडून आहेत, ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचे शासकीय नुकसान होत आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, नियमित देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे तसेच संबंधित यंत्रणेतील हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेसारख्या अत्यावश्यक सेवांवर प्रतिकूल परिणाम होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

श्री. नाईक यांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच, बंद अवस्थेतील वाहने त्वरित दुरुस्त करून सेवेत आणावीत आणि नागरिकांना मूलभूत नागरी सेवा पुरवण्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button