जळगावसामाजिक

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती वाटप; क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

जळगाव, ता. ७ ऑगस्ट – क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशन आणि क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथे पार पडला. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते इयत्ता दहावी उत्तीर्ण ९ गुणवत्ताधारक विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

उपक्रमाचा उद्देश ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा असून, विद्यार्थिनींच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख नितेशकुमार इंगळे, क्षेत्रीय अधिकारी राजु डी.बी. पाटील, माधव शिंदे, शाखाधिकारी उमेश काळे, तसेच विद्यार्थींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिष्यवृत्तीचा लाभ लिशा फेगडे, पार्ची चौधरी, चंचल पाटील, योगेश्वरी चौधरी, भूमिका पाटील, जान्हवी बाविस्कर, स्नेहल चव्हाण, पूर्वा महाले आणि स्वाती चौधरी या विद्यार्थिनींना झाला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कार्यक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची संधी मिळते आणि त्यांचे स्वप्न साकारण्यास मदत होते.” दिवसेंदिवस शैक्षणिक स्पर्धा वाढत असताना, आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहते. अशा परिस्थितीत अशा शिष्यवृत्ती उपक्रमांची गरज अधिक जाणवते, असे प्रतिपादन संस्थेचे विभागीय अधिकारी नितेशकुमार इंगळे यांनी केले.

दरवर्षी अशा प्रकारच्या शिष्यवृत्ती उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती एरिया मॅनेजर राजु डी.बी. पाटील यांनी दिली. मायक्रो फायनान्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडतर्फे ग्रामीण विद्यार्थिनींना सक्षम व स्वावलंबी बनवण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button