
भुसावळ, दि. १८ सप्टेंबर २०२६ : येथील पु. ओं. नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात ‘ऑनलाइन शिक्षण पद्धती : योग्य की अयोग्य?’ या विषयावर वादविवाद स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणाच्या फायदे-तोट्यांवर अभ्यासपूर्ण व प्रभावी मते मांडत स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रमा मसाने यांनी केले. समितीच्या चेअरमन सौ. ज्योती पाटील यांनी प्रास्ताविक केले. डिजिटल युगातील शिक्षणाचे बदलते स्वरूप आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेत विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले होते. ऑनलाइन शिक्षणाच्या बाजूने बोलणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही पद्धत सुलभ, लवचिक आणि आधुनिक असून, घरबसल्या विविध स्रोतांद्वारे ज्ञान मिळविणे शक्य होत असल्याचे सांगितले. तसेच वेळ व खर्चाची बचत आणि कोरोना काळात शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात ऑनलाइन शिक्षणाची झालेली मदत यावर त्यांनी प्रकाश टाकला.
ऑनलाइन शिक्षणाच्या विरोधातील गटाने सतत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम, विद्यार्थ्यांमधील प्रत्यक्ष सामाजिक संवाद कमी होणे, वर्गातील शिस्त व प्रत्यक्ष संवादातून मिळणाऱ्या अनुभवांचा अभाव, तसेच ग्रामीण भागातील नेटवर्कच्या समस्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या मुद्द्यांना प्रत्युत्तर देत आक्रमक व अभ्यासपूर्ण पद्धतीने आपली मते मांडली.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. सौ. कुंदा चौधरी, प्रा. एन. झेड. रत्नपारखी आणि प्रा. एन. पी. निळे यांनी केले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक अन्वी प्रांजल नेवे (इयत्ता ११ वी, विज्ञान), द्वितीय क्रमांक वारुणी कुंदन पाटील (इयत्ता ११ वी, विज्ञान), तृतीय क्रमांक यशश्री राजेंद्र चव्हाण (इयत्ता ११ वी, विज्ञान), तर उत्तेजनार्थ सोनल किरण राणे (इयत्ता ११ वी, विज्ञान) हिने मिळविला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. कोणतेही मत पूर्णपणे योग्य किंवा अयोग्य नसते. प्रत्येकाला आपली मांडलेली बाजू योग्य वाटत असते, असे सांगितले. हा विषय वैचारिक देवाणघेवाणीच्या दृष्टीने पाहावा, असे त्यांनी नमूद केले. प्रा. ललिता धांडे यांनी आभार मानले.
स्पर्धेस कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. वाय. एम. पाटील व पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये याचप्रमाणे उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती स्वाती पाटील यांनी केले. समिती सदस्य प्रा. ए. बी. पालवे व जे. टी. बेंडाळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






