

जळगाव : सूर्यजीवनी बहुउद्देशीय संस्था, जळगावचा 12 वा वर्धापन दिन दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी संस्थेच्या प्रशस्त हॉलमध्ये विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल जाधव होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. जाधव उपस्थित होत्या. संस्थेचे सचिव हरिश्चंद्र सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती.
या निमित्ताने सूर्यजीवनी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य संग्रामावर आधारित 50 प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष सुनिल जाधव व सौ. जाधव यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत 70 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते व त्यांचे दोन गट करण्यात आले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सुनिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली.




