
मेहरुण (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा “टाकाऊपासून टिकाऊ” हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी वापरात नसलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून आकर्षक व कलात्मक फुलांच्या कुंड्या तयार करत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी विविध रंगसंगती, आकर्षक सजावट आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून प्लास्टिकच्या बाटल्यांना नवसंजीवनी देत त्यांचे सुंदर फुलकुंड्यांमध्ये रूपांतर केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुनर्वापराचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सर्जनशीलतेचा विकास होण्यास मोठी मदत झाली.
हा उपक्रम शिक्षिका उज्वला नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुनर्वापराची सवय अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पर्यवेक्षिका शितल कोळी यांनी अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे सांगत भविष्यातही अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करून त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले.






