

जळगाव :- आजच्या काळात संपूर्ण देशभरात संविधान खतरेमे है चे नारे लागत आहेत , सर्वोच्य न्यायालयात संसद श्रेष्ठ की संविधान श्रेष्ठ असा वाद होतो , अनेक तरुण संविधान विरोधी नारे देतात , काही माथेफिरू तिला जाळून टाकतात , काही तथाकथित उच्यभृ तिची टिंगल करून टाळ्या मिळवतात , काही संघटना संविधानाच्या विरुद्ध अभियान राबवितात ही परिस्थिती अशीच राहिली तर देशात समता , स्वातंत्र्य सारखी उच्य मूल्ये शिल्लक राहणार नाही व देशात अराजकता निर्माण होईल त्या करिता संविधान जागर व त्या विषयीच्या स्पर्धा तरुणांना नक्कीच नवी दिशा देईल असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

अप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठान व नूतन मराठा महाविद्यालय , जळगाव तर्फे आयोजित राजेंद्र भालेराव स्मृती संविधान जागर करंडक स्पर्धा दिनांक १५ ऑगस्ट रोजी नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली असता त्याचे उद्घाटन करताना वाघ बोलत होते .
आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन स्वरूपाची ही स्पर्धा होती यात ४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आंतर शालेय स्पर्धेत कुमारी वैष्णवी पाटील ने प्रथम क्रमांक , काव्या फेगडे द्वितीय , काव्या पवार तृतीय उत्तेजनार्थ दिशा सूर्यवंशी , प्रथमेश गौरव तर आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत कुमारी कावेरी नेरकर प्रथम क्रमांक , आलिया बी अमजद द्वितीय क्रमांक प्राप्त केला . या प्रसंगी फक्त ४ वर्षीय प्रेरणा राजेंद्र बाविस्कर या मुलीने अतिशय सुस्पष्ट स्वरूपात प्रस्तावना तोंडपाठ म्हणून दाखविली तिला १००० रुपये रोख स्वरूपात देण्यात आले . नाट्यकर्मी उदय सपकाळे व सामाजिक कार्यकर्त्या सुश्मिता भालेराव यांनी परीक्षक म्हणून काम केले. या स्पर्धेला स्पर्धक व त्यांचे आई , वडील हजर होते .
प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या , विलास यशवंते , कुलदीप भालेराव मुख्य अतिथी म्हणून हजर होते . सूत्रसंचालन शरद भालेराव यांनी तर आभारप्रदर्शन प्रशांत सुरवाडे यांनी केले .




