जळगावआरोग्य

‘मोतीबिंदूमुक्त तालुका’ अभियानाला वेग : आ. अमोल जावळे यांच्या पुढाकाराने २५ ज्येष्ठ नागरिकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव – यावल-रावेर तालुक्यातील नागरिकांना ‘मोतीबिंदूमुक्त’ करण्याच्या उद्देशाने आमदार अमोल जावळे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला गती मिळत आहे. रविवारी त्यांच्या पुढाकारातून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागात तब्बल २५ ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.

शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांना आवश्यक उपचार देऊन घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे, संपूर्ण शस्त्रक्रिया व रुग्णवाहिका सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

वैद्यकीय तज्ज्ञांचे मोलाचे सहकार्य

या शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील, डॉ. दिव्या सोनवणे, डॉ. शोबिया अन्सारी, डॉ. वृंदा कुंभारे, डॉ. भारती वाणी, डॉ. मयुरेश डोंगरे व डॉ. स्वाती असोले यांचे विशेष योगदान लाभले.

कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शिबिराचे नियोजन व अंमलबजावणीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यात शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज पाटील, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आरोग्यदूत पै. शिवाजी पाटील, होनाजी चव्हाण, चैतन्य कोल्हे व तुषार घुगे पाटील यांचा मोलाचा सहभाग राहिला.

लोककल्याणासाठी विधायक उपक्रम

आ. अमोल जावळे म्हणाले, “अनेक गरीब व दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे योग्य नेत्रउपचार मिळत नाहीत. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आहे. हे समाधान देणारे कार्य असून ‘मोतीबिंदूमुक्त यावल-रावेर तालुका’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन पुढेही सातत्याने केले जाईल.”

आ. अमोल जावळे यांच्या या उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठांना नवे जीवन लाभले असून, या लोककल्याणकारी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button