राज्यप्रशासकीय

जळगावने दिली नियुक्ती, नाशिक मात्र गतीशून्य; सैरभैर आरोग्यसेवक उमेदवारांची लोकप्रतिनिधींना आर्त हाक.

नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पदांच्या 50 टक्के भरती प्रक्रियेचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे ग्रामविकास विभागाने 12 मार्च 2025 रोजी “तात्काळ नियुक्ती” देण्याचे निर्देश दिले असतानाही आज 40 दिवस उलटूनही उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळालेले नाही.

20 मार्च 2025 रोजी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना आश्वासने देण्यात येत असली तरी, ती केवळ भ्रामक असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. याउलट जळगाव जिल्हा परिषदेने 28 मार्चला पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून केवळ दोन आठवड्यांतच म्हणजे 15 एप्रिल रोजी नियुक्ती दिली आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेने नियुक्ती प्रक्रियेसाठी वेगळी नियमावली तयार केली आहे का, असा सवाल उमेदवार उपस्थित करत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसीय अभियानामुळे कर्मचारी त्या कामात गुंतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यामुळे सामान्य जनतेच्या गरजा कोण पूर्ण करणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेतील अंतर्गत राजकारण आणि विभागीय समन्वयाच्या अभावामुळे ही भरती प्रक्रिया रखडल्याची कुजबुज आहे. या प्रक्रियेत नाहक उमेदवार भरडले जात असून, त्यांच्या आयुष्याचा महत्वपूर्ण काळ वाया जात आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आरोग्य सेवकांची भरती अत्यावश्यक असताना, रिक्त पदांमुळे आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता तीव्रतेने जाणवत आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी निवड समितीच्या सदस्यांकडे वारंवार विचारणा केली असली तरी, त्यांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत.

अखेर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांनी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीपकाका बनकर, आमदार दिलीप बोरसे आणि खासदार भास्कर भगरे सर यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करत लवकरात लवकर नियुक्त्या देण्याबाबत आग्रहाची विनंती केली आहे.

उमेदवार आता केवळ आश्वासनांवर न राहता ठोस कृतीची वाट पाहत आहेत. नियुक्ती लवकर झाल्यास त्यांच्या प्रतीक्षेला शेवट मिळेल आणि ग्रामीण आरोग्य सेवाही अधिक सशक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button