
कंडारी (ता. जळगाव) : हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देत नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य उपकेंद्र कंडारी व कार्यक्षेत्रात राष्ट्रीय हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
“Driven to end malaria, now we can, now we must” (हिवताप निर्मूलनासाठी आपण सक्षम आहोत — आता आपण कृती केलीच पाहिजे) या घोषवाक्याच्या माध्यमातून नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव जाधव व डॉ. अजय पाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
हिवताप हा डासांद्वारे पसरणारा गंभीर आजार असून, वेळेवर निदान व उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. यासाठी गावपातळीवर कंटेनर सर्वेक्षण, तापग्रस्त रुग्णांची तपासणी, रक्त तपासणी व आवश्यक औषधोपचार यावर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
हिवताप प्रतिबंधासाठी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करणे, डास प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे आणि ताप आल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासणी करून घेणे, असे महत्त्वाचे मार्गदर्शन आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके यांनी नागरिकांना दिले.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शिरीन कमलाकर पाटील तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.






