क्राईमजळगाव

जळगावात भंगार दुकानांवर पोलिसांची धडक; चोरीची साखळी तोडण्याचा प्रयत्न

जळगाव, दि. ५ मे २०२६ – जळगाव जिल्ह्यात आज सायंकाळपासून पोलिसांकडून भंगार दुकानांची (Scrap Shops) विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत असून, चोरीच्या मालाच्या खपावर आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, घरफोडी, वाहन चोरी तसेच सार्वजनिक मालमत्तेची चोरी (जसे रेल्वेचे रूळ, विजेच्या तारा) आणि शेतीतील अवजारे, मोटारी आदींचा माल त्वरित विक्रीसाठी भंगार दुकानांचा वापर केला जातो. गुन्हेगार चोरी केलेला माल थेट बाजारात विकू शकत नसल्याने, तो कमी किमतीत भंगार दुकानदारांकडे विकला जातो.

विशेष म्हणजे, काही भंगार दुकाने चोरीच्या वाहनांचे सुटे भाग करून विक्री (Vehicle Scraping) करण्याचे केंद्र बनल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या साखळीला खंडित करण्यासाठी पोलिसांनी जिल्हाभरात एकाचवेळी तपासणी मोहीम राबवली आहे.

या मोहिमेदरम्यान भंगार दुकानांची नोंदवही, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड, तसेच संशयास्पद मालाची तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

 

पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button