जळगावप्रशासकीय

जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा सक्रिय; महिलांच्या सुरक्षेसाठी नवी दमदार सुरुवात

जळगाव : महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे ‘दामिनी पथक’ जळगाव शहरात पुन्हा कार्यरत करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पथक बंद असल्याची बाब समोर आल्यानंतर तात्काळ यावर कारवाई करत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पथक पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.


यावेळी पोलीस अधीक्षकांनी नव्याने नियुक्त महिला अंमलदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. पथकासाठी एक चारचाकी व दोन दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून, शहरातील विविध भागात सक्रिय गस्त वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.


दामिनी पथकाचे मुख्य उद्दिष्ट महिलांची व विद्यार्थिनींची सुरक्षा सुनिश्चित करणे हे असून, छेडछाड, अत्याचार, घरगुती हिंसा यांसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे, तसेच महिलांना तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा यामागचा प्रमुख हेतू आहे. याशिवाय समाजात विश्वास निर्माण करणे आणि महिलांमध्ये जागरूकता वाढविण्याचेही काम पथक करणार आहे.
पथकाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ व इतर सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’ तसेच सोशल मीडियाच्या दुरुपयोगाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
महिला हेल्पलाईन क्रमांक १०९१ वर प्राप्त होणाऱ्या कॉल्सवर तात्काळ प्रतिसाद देत, शक्यतो १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पीडित महिलांना कायदेशीर, वैद्यकीय व मानसिक आधार देणे, समुपदेशन करणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणे यावर विशेष भर राहणार आहे.
दामिनी पथकाच्या पुनरुज्जीवनामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button