
जळगाव : समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण, जळगाव, जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना आणि भगवान सेना, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा भव्य “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ – २०२६” रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता लाडवंजारी समाज मंगल कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सत्कार समारंभात इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, विविध शासकीय व निमशासकीय सेवेत निवड झालेल्या समाजबांधव तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सत्कारासाठी इच्छुक विद्यार्थी व पात्र व्यक्तींनी पासपोर्ट आकाराचा फोटो आणि गुणपत्रिकेची प्रत दि. २० जुलै २०२६ पर्यंत आपल्या गाव किंवा तालुका प्रतिनिधीकडे जमा करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.
यावर्षी पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत संपूर्ण कार्यक्रम पेपरलेस पद्धतीने आयोजित करण्यात येत असून, निमंत्रणपत्रिका छापण्याऐवजी सर्व निमंत्रणे ऑनलाइन माध्यमातून देण्यात येत आहेत. त्यामुळे समाजबांधवांनी हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील विविध गाव व तालुक्यांमध्ये प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून, त्यांनी आपल्या परिसरातील गुणवंत विद्यार्थी, पालक व समाजबांधवांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाला विविध दानशूर व्यक्ती व संस्थांचे सहकार्य लाभले असून, त्यांच्या योगदानाबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रशांत नाईक (माजी नगरसेवक), उपाध्यक्ष श्री. नामदेव वंजारी, सचिव श्री. महादू सोनवणे यांच्यासह सर्व पदाधिकारी तसेच समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण आणि भगवान सेना, जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व समाजबांधव, पालक, गुणवंत विद्यार्थी, युवक-युवती व समाजसेवकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.






