
मेहरुण, ता. जळगाव : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी “टिळक जिगसॉ मिशन” हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका सौ. शितल कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागून लोकमान्य टिळकांचे छायाचित्र जिगसॉ स्वरूपात जोडण्याचे आव्हान देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने, सहकार्यभावनेने आणि विचारकौशल्याच्या आधारे अल्पावधीत जिगसॉ पूर्ण केला. त्यानंतर प्रत्येक गटाने लोकमान्य टिळकांचे जीवनकार्य, स्वातंत्र्य चळवळीतले योगदान आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड, निरीक्षणशक्ती, नेतृत्वगुण, संघभावना आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लोकमान्य टिळकांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
या उपक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ. शितल कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका सौ. रूपाली आव्हाड यांनी उपक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केली. तसेच उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.






