जळगावप्रशासकीयसामाजिक

शाळांबाहेर गुप्तपणे विकल्या जाणाऱ्या ‘मिनी मोबाईल’चा पर्दाफाश; जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन सजग’ यशस्वी

जळगाव : शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने जळगाव शहर पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन सजग’ या प्रायोगिक सोशल एक्सपेरिमेंटमधून धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील एका मुलींच्या शाळेबाहेर काही व्यक्ती गुप्तपणे अतिशय लहान आकाराचे मोबाईल फोन स्वस्त दरात विक्री करत असल्याचे तसेच विद्यार्थिनींना त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून इतरांशी संपर्क साधण्यासाठी मदत करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याबाबत दामिनी पथकातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी काही दिवस सिव्हिल ड्रेसमध्ये संबंधित शाळेच्या परिसरात पाळत ठेवली. या दरम्यान शाळेबाहेर तात्पुरते स्टॉल लावणाऱ्या काही व्यक्तींकडून सहज लपवता येतील असे अतिशय छोटे मोबाईल फोन सुमारे ९०० ते १,००० रुपयांत विकले जात असल्याचे आढळून आले. हे मोबाईल आकाराने इतके लहान आहेत की ते सहज कुठेही लपवता येतात आणि घरच्यांच्या नजरेतही येत नाहीत.

कारवाईदरम्यान दामिनी पथकाने काही विद्यार्थिनींकडून असे मिनी मोबाईल जप्त केले. त्यानंतर संबंधित शाळेच्या प्रशासनाला व विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून समुपदेशन करण्यात आले आणि जप्त केलेले मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

जळगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी पालक व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

– शाळांच्या परिसरात, एसटी स्थानक, रिक्षा थांबे किंवा विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे गुप्तपणे मिनी मोबाईल विक्री करणाऱ्या व्यक्ती आढळल्यास तात्काळ दामिनी पथकाशी संपर्क साधावा.

– पालकांनी आपल्या मुली अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून कोणाशी संपर्क साधत आहेत का किंवा अशा व्यक्तींच्या प्रभावाखाली तर नाहीत ना, याबाबत नियमितपणे लक्ष ठेवावे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या या ‘ऑपरेशन सजग’मुळे शाळांबाहेरील अशा बेकायदेशीर व संशयास्पद प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button