
नशिराबाद – राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उपकेंद्र नशिराबाद १ मध्ये ‘कुष्ठरुग्ण सहवासित तपासणी कार्यक्रम’ सध्या वेगाने राबवला जात आहे. मागील पाच वर्षांत (सन २०२१ ते २०२६) क्षेत्रात आढळलेल्या कुष्ठरुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची नियमित आरोग्य तपासणी करून कुष्ठरोगाचे प्रमाण पूर्णपणे नियंत्रित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत करण्यात येत असलेल्या घरोघरी सर्वेक्षणाची प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा कोलते यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेट देऊन पाहणी केली व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान डॉ. स्नेहा कोलते यांनी आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पडताळणी केली. कुष्ठरोगाचे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि संभाव्य शारीरिक विकृती टाळता येऊ शकते, त्यामुळे सहवासितांची तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. आरोग्य पथकाने नशिराबाद परिसरातील विविध कुटुंबांना भेटी देऊन संशयित लक्षणांबाबत प्राथमिक शारीरिक तपासणी केली. तसेच पत्रके वाटून समाजात कुष्ठरोगाविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.
या सर्वेक्षण व जनजागृती मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा कोलते यांच्या सुचने नुसार आरोग पथक:- आरोग्य सेवक सुनील ढाके, दीपक तायडे, संदेश महाजन आणि आशा सेविका सुवर्णा पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या आरोग्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे






