जळगावसामाजिक

सर्पदंशाबाबत जनजागृती; प्रतिभा माध्यमिक विद्या मंदिरात ‘शून्य सर्पदंश’ अभियान

जळगाव : वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था आणि वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रतिभा माध्यमिक विद्या मंदिर, ता. जि. जळगाव येथे ‘शून्य सर्पदंश’ अभियानांतर्गत सर्पविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य हेमराज संपकाळे यांनी विद्यार्थ्यांना सर्पविषयक मार्गदर्शन केले. विषारी व बिनविषारी सापांची ओळख कशी करावी, सापांचे पर्यावरणातील महत्त्व, सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी, प्रथमोपचाराची योग्य पद्धत, सर्पदंशाबाबत समाजात असलेले गैरसमज तसेच अंधश्रद्धा याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या व समजेल अशा भाषेत माहिती देण्यात आली.

साप हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असून, सापांना विनाकारण न मारता त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे, याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी योग्य माहिती, दक्षता आणि शास्त्रीय दृष्टिकोन आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास प्रतिभा माध्यमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक बाविस्कर सर, चंदनकर मॅडम, वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनंत जोशी, सदस्य सागर जोशी तसेच संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते.

या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थी व शालेय कर्मचाऱ्यांना सर्पांविषयी महत्त्वपूर्ण व उपयुक्त माहिती मिळाली. सर्पसंवर्धन आणि सर्पदंश प्रतिबंधाबाबत जनजागृती केल्याबद्दल प्रतिभा माध्यमिक विद्या मंदिराच्या वतीने वन्यजीव संरक्षण संस्था आणि वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्थेचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button