जळगावशैक्षणिक

“दप्तर तपासले, ओझे कमी केले; School Bag Policy 2020 ची शाळेत प्रभावी अंमलबजावणी”

मेहरूण : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे कमी करून त्यांना आरोग्यदायी, आनंददायी आणि तणावमुक्त शिक्षणाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे School Bag Policy 2020 च्या अनुषंगाने ‘स्मार्ट दप्तर’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या दप्तरातील पुस्तके, वह्या, शैक्षणिक साहित्य तसेच अनावश्यक वस्तूंची तपासणी केली. वर्गनिहाय वेळापत्रकानुसार आवश्यक तेवढेच साहित्य दप्तरात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दप्तराचे वजन तपासून त्यातील अनावश्यक वस्तू बाजूला केल्या. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी करण्यासोबतच ‘गरजेपुरते साहित्य आणि नियोजनबद्ध दप्तर’ ही सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दप्तराचे वजन केवळ शारीरिक ओझे नसून त्याचा त्यांच्या आरोग्यावर, बसण्याच्या पद्धतीवर आणि शालेय अनुभवावर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या दप्तराचे परीक्षण करून समस्या ओळखणे, माहितीचे विश्लेषण करणे, योग्य निर्णय घेणे आणि उपाययोजना करणे यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

‘माझे दप्तर – माझी जबाबदारी’ या विचारातून विद्यार्थ्यांनी दररोजच्या वेळापत्रकानुसार पुस्तके व वह्या आणणे, अनावश्यक वस्तू दप्तरात न ठेवणे, शैक्षणिक साहित्याची योग्य मांडणी करणे आणि दप्तराची नियमित तपासणी करणे याबाबत संकल्प केला.

उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, नियोजन, समस्या निराकरण, चिकित्सक विचार, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना यांसारख्या २१व्या शतकातील कौशल्यांना चालना मिळाली. तसेच विद्यार्थ्यांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध कल्पना मांडत ‘स्मार्ट दप्तर’ संकल्पना अधिक प्रभावी केली.

शाळेच्या वतीने पालकांनाही विद्यार्थ्यांच्या दप्तरातील साहित्याचे नियमित नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयातून दप्तराचे ओझे नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

School Bag Policy 2020 च्या उद्देशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ दप्तर तपासणी न ठरता आरोग्य, स्वयंशिस्त, नियोजन आणि कौशल्याधारित शिक्षणाचा अनुभव ठरला.

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी केली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘दप्तर हलके, विचार मोठे’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button