
मेहरूण (जळगाव) प्रतिनिधी : भारताचे माजी राष्ट्रपती व थोर तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात व कृतज्ञतापूर्वक साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पाचवी ते दहावीतील निवडक विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षकाची भूमिका पार पाडत विविध विषयांचे अध्यापन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कौशल्य तसेच शिक्षकाची जबाबदारी प्रत्यक्ष अनुभवली. कु. आलिया राजू शेख हिने एक दिवसाच्या मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळत शालेय कामकाजाचा अनुभव घेतला. पुष्कर चौधरी याने उपमुख्याध्यापकाची भूमिका बजावली, तर इतर विद्यार्थ्यांनी शिपाई व लिपिक आदी कर्मचाऱ्यांच्या भूमिका पार पाडल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे उपाध्यक्ष श्री. बाळाजी सानप होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. पन्नालाल वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, संस्थेचे सचिव श्री. अशोकभाऊ लाडवंजारी, मुख्याध्यापक श्री. दिवाकर जोशी, संचालक श्री. भगवान लाडवंजारी व शिक्षक श्री. अमित तडवी उपस्थित होते. मान्यवरांचे विद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शिक्षकाची भूमिका बजावलेल्या खुशी माळी व पुष्कर चौधरी यांनी अध्यापनाचे अनुभव कथन केले. वैष्णवी सिद्धार्थ व आलिया पिंजारी यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. मुख्याध्यापक श्री. दिवाकर जोशी यांनी विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाची माहिती देत मार्गदर्शन केले. श्री. अमित तडवी यांनी शिक्षक दिन साजरा करण्यामागील उद्देश तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात श्री. बाळाजी सानप यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार व अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी संस्थेतर्फे विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख श्री. किरण पाटील, उपसांस्कृतिक प्रमुख श्री. दिनेश पाटील व सौ. प्रतिभा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कल्याणी कोचुरे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.






