जळगावआरोग्य

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जळगाव : श्रावण सप्ताहातील शेवटच्या सोमवाराचे औचित्य साधून आज, दिनांक ०७ सप्टेंबर २०२६ रोजी श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर परिसर, जळगाव येथे भव्य मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबीराचा लाभ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या 152 भाविकांनी व नागरिकांनी घेतला.

शिबीरादरम्यान आलेल्या रुग्णांची सखोल नेत्र व शारीरिक तपासणी करून त्यांना मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले. या शिबीरात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. रेखा राजपूत,डॉ. किशोर देशमुख तसेच नेत्र चिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला. या आरोग्य कार्यात प्रशिक्षणार्थी बिभीषण पोळे, विशंभर ढगे, दीपाली बोर्डे, फिया पटेल, धनश्री तायडे आणि अविनाश जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.

हे सामाजिक व आरोग्यदायी शिबीर श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. श्री. राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने यशस्वीरीत्या पार पडले.

तसेच ओंकारेश्वर मंदिराचे व्यवस्थापक जुगल किशोर जोशी व विश्वस्थ ओंकारेश्वर मंदिर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल ओंकारेश्वर मंदिरातील भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी विशेष आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button