सामाजिकजळगाव

होरपळणाऱ्या उन्हात मायेची सावली; जळगाव पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

जळगाव (दि. ७ मे २०२६) – जळगाव शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तीव्र तापमानामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. याचा सर्वाधिक फटका हा रस्त्याच्या कडेला बसून छोट्या व्यवसायातून उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी विक्रेत्यांना बसत आहे. भर दुपारी अंगावर आग ओकणारे ऊन, डोक्यावर सावली नाही, पिण्यासाठी थंड पाण्याचीही मर्यादित सोय — अशा परिस्थितीत अनेक विक्रेते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर रस्त्यावर संघर्ष करताना दिसतात.

अशा कष्टकरी नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा आणि त्यांचे दैनंदिन काम थोडे सुसह्य व्हावे यासाठी जळगाव पोलिसांतर्फे संवेदनशील सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील रस्त्याच्या कडेला  किरकोळ व्यवसाय करणाऱ्या 20 विक्रेत्यांची निवड करण्यात आली. ट्रॅफिक कार्यालय येथे या विक्रेत्यांसाठी उपयुक्त अशा छत्र्या तसेच गार पाणी ठेवण्यासाठी मिल्टन कंपनीच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले.

सदर लाभार्थ्यांची निवड देखील काळजीपूर्वक करण्यात आली असून पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व विक्रेत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक विक्रेत्यांनी वाढत्या उष्णतेमुळे काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. पोलिसांनीही त्यांच्या संघर्षाची दखल घेत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेची ओळख असलेल्या पोलिस दलाने यावेळी संवेदनशील सामाजिक भूमिका घेत कष्टकरी नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामुळे हा उपक्रम केवळ साहित्य वितरणापुरता मर्यादित न राहता “माणुसकीची सावली” म्हणून अनेकांच्या मनात घर करत आहे.

जळगाव पोलिसांच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे शहरभर स्वागत होत असून, कडक उन्हात कष्ट करणाऱ्या सामान्य नागरिकांप्रती पोलिसांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button