जळगावक्राईम

जामनेर येथे भूकरमापकाला 200 रुपयांची लाच घेतांना अटक; यापूर्वीही लाच घेतल्याचा गुन्हा दाखल

जामनेर : शेतजमिनीच्या मोजणीसाठी आवश्यक असलेले स्कीम पत्रक व टिपण उताऱ्याची साक्षांकित प्रत देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक भगवान रोहिदास गायकवाड या लोकसेवकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तडजोडीनंतर २०० रुपयांची लाच स्वीकारताना त्याला पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

या प्रकरणातील तक्रारदार हे ६५ वर्षीय शेतकरी असून त्यांची नेरी बु., ता. जामनेर येथे शेतजमीन आहे. संबंधित शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी आवश्यक असलेले स्कीम पत्रक व टिपण उताऱ्याची साक्षांकित प्रत मिळण्यासाठी तक्रारदाराने दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी भूमी अभिलेख कार्यालय, जामनेर येथे अर्ज केला होता.

संबंधित कामासाठी आरोपी भगवान गायकवाड याने तक्रारदाराकडे सुरुवातीला ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव कार्यालयाकडे तक्रार नोंदविली होती.

तक्रारीची दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान आरोपीने तडजोडीअंती २०० रुपये लाचेची मागणी केल्याचे तसेच ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली असता आरोपीने पंचांसमक्ष २०० रुपयांची लाच स्वीकारल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आरोपी भगवान गायकवाड याच्याविरुद्ध यापूर्वीही २०१२ मध्ये भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाच स्वीकारल्याप्रकरणी त्याच्याविरुद्धची ही दुसरी कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा रचून पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी हि कारवाई केली. सापळा पथकात पोलीस कॉन्स्टेबल बाळू मराठे, प्रणेश ठाकूर व सचिन चाटे सहभागी होते. सदर कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button