
जळगाव : बालरत्न फाउंडेशनच्या वतीने क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त गिरणा पंपिंग रोडवरील नितीन सायकल मार्ट येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशभक्ती, सामाजिक ऐक्य, प्रेरणा आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. बालरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश राखपसरे तसेच नीलिमा कजबे, राकेश बडोले, नितीन राखपसरे, निलेश मोरे, शुभम मोरे, राहुल नन्नवरे, योगेश बागडे, निलेश अहिरे व मोसिम शेख यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी परिसरातील नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला. शहीद भगतसिंग यांच्या देशभक्ती, त्याग आणि क्रांतिकारी विचारांना अभिवादन करत उपस्थितांमध्ये सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित नागरिकांना शरबत व केळीचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणीव, एकोपा, देशप्रेम आणि सेवाभाव वृद्धिंगत करण्यासाठी बालरत्न फाउंडेशनच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





