जळगावशैक्षणिक

शकुंतला माध्यमिक विद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

जळगाव : शकुंतला माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती राजेश्री महाजन होत्या. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यालयात वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत इयत्ता पाचवीतील सागर गोपाळ आणि इयत्ता आठवीतील ऋषभ कुमावत यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

यावेळी डॉ. प्रतिभा पाटील यांनी आपल्या मनोगतात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मिती क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व विशद केले. वाचनामुळे ज्ञानात भर पडण्यासोबतच विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः वाचनसंस्कृती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती राजेश्री महाजन यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी, चिकित्सक विचारसरणी विकसित करावी आणि आयुष्यात उच्च ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक अरविंद सुरळकर, योजना चौधरी, प्रतिभा चौधरी, हर्षा चौधरी, जागृती अहिरे, एल. पी. चौधरी, फिरके सर आणि एस. पी. नेहते यांनी सहकार्य केले. तसेच सद्गुरू महाविद्यालयातील अंतरवासिता छात्र-अध्यापक विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला.

डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा जागर करत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button