
जळगाव : हिंदू धर्मात वसुबारस या सणाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. गायीची पूजा करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मेहरुण येथील श्री. किशोर देविदास पाटील यांच्या कुटुंबासाठी यंदा अविस्मरणीय ठरला. वसुबारसच्या पवित्र दिवशीच त्यांच्या गायीने एका गोंडस वासरीला जन्म दिला. त्यामुळे पाटील कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
विशेष म्हणजे, ज्या दिवशी गायीची पूजा करून तिचे महत्त्व अधोरेखित केले जाते, त्याच दिवशी गायीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने या घटनेला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. सणाच्या उत्साहात या आनंददायी घटनेची भर पडल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसुबारसच्या दिवशी घडलेला हा सुंदर योगायोग परिसरातही चर्चेचा विषय ठरत असून, अनेकांनी पाटील कुटुंबीयांचे अभिनंदन करून नवजात वासरीला शुभेच्छा दिल्या. निसर्गाने जणू वसुबारसच्या शुभमुहूर्तावर पाटील कुटुंबाला आनंदाची अनमोल भेटच दिली आहे.






