

जळगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत श्री. चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय आणि श्री.पी. ई.तात्या पाटील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भीमकन्या बहुउद्देशीय महिला संस्थेतील’ व वाघ नगर परिसरातील सर्व महिलांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदर तपासणी शिबिरा दरम्यान ज्या महिलांना आरोग्याच्या समस्या आढळलेल्या त्या सर्व रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषध देण्यात आले. श्री. चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, सचिव राहुल पाटील यांच्या परवानगीने तसेच मार्गदर्शन व सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
आरोग्य शिबिरात डॉ. जयेश वाल्हे यांनी सर्व उपस्थित महिलांची नेत्र तपासणी केली. तसेच डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. सोनाली मोरे यांनी आरोग्य तपासणी केली. या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा या उद्देशाने सर्व महिलांसाठी वाघ नगर येथून आरोग्य शिबिरात येण्यासाठी वाहतुकीसाठी श्री. चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालयाची बस उपलब्ध करून देण्यात आलेली होती.
याप्रसंगी सुरेखा चंद्रकांत भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व मोफत आरोग्य व नेत्र तपासणी केल्याबद्दल होमिओपॅथी महाविद्यालय रुग्णालयाचे आभार मानले. सदर आरोग्य शिबिरास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग, भीम कन्या बहूउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा माधुरी बापू साळुंखे, विशाखा अशोक हनवते, उषा अशोक सपकाळे, संगीता बाबूलाल सपकाळे, माधुरी राजु वाघ, ज्योती किशोर साळुंखे, रत्ना गणेश मनुरे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.



