

जळगाव — जोहार छत्तीसगड पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अमित बघेल यांनी अग्रवाल समाजाच्या आराध्य दैवत श्री छत्रपती महाराजा अग्रसेनजी यांच्याविषयी सोशल मीडियावर केलेल्या अभद्र आणि आपत्तिजनक टिप्पणीनंतर संपूर्ण अग्रवाल समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये छत्तीसगड सरकारने अमित बघेल यांच्यावर एफ.आय.आर. दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अमित बघेल यांनी समाजात धार्मिक द्वेष आणि असंतोष निर्माण करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक अपमानास्पद विधान केले असून त्यामुळे समस्त अग्रवाल समाजाच्या भावना खोलवर दुखावल्या गेल्या आहेत. श्री महाराजा अग्रसेन हे अग्रवाल समाजाचे कुलसंस्थापक असून त्यांनी पाच हजार वर्षांपूर्वी अग्रोहा नगरची स्थापना करून अहिंसा, समता आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिला. अशा ऐतिहासिक व महान व्यक्तिमत्त्वाचा अपमान करणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
अग्रवाल समाज भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असून व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात समाजाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे अशा समाजाच्या आराध्य दैवताचा अपमान करून स्वस्त प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित बघेल यांच्यावर ‘रासुका’ अंतर्गत कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. सदर निवेदन अग्रश्री पवनकुमार मित्तल (चेअरमन), डॉ. सुरेश अग्रवाल (अध्यक्ष) आणि रोहित अग्रवाल (महामंत्री) यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. निवेदन देतांना अग्रवाल समाज बांधव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




