
“(प्रतिकात्मक छायाचित्र)”
जामनेर : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत जामनेर शहरातील हिवरखेडा रोड परिसरातील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, टीव्ही, एटीएम कार्डसह तब्बल 10 लाख 53 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जामनेर पोलीस स्टेशन हद्दीत काही इसम आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार हिवरखेडा रोडवरील एका घरावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 9 लाख 2 हजार 300 रुपये रोख रक्कम,
1 लाख 30 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, 25 हजार रुपये किमतीचा टीव्ही व साउंड बार तसेच 41 एटीएम कार्ड आणि इतर साहित्याचा समावेश आहे.
या प्रकरणी देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रविंद्र पाटील व प्रवीण जगन्नाथ टहाकडे (सर्व रा. जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईनंतर जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 236/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4 व 5 प्रमाणे चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






