जळगावक्राईम

धरणगाव व भुसावळात गावठी पिस्तुलांसह तिघे जेरबंद

जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुरुवारी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तिघांना अटक केली. धरणगाव आणि भुसावळ येथे झालेल्या या कारवायांमध्ये गावठी पिस्तुले, मॅगझिन आणि जिवंत काडतूस असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धरणगावमध्ये गावठी पिस्तूलसह एक जेरबंद

धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत १४ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीच्या पात्रात एक संशयित इसम फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आनंदा बळीराम सपकाळे (वय ३९, रा. सिद्धार्थ नगर, आव्हाणे, ता. जळगाव) याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे लोखंडी सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्तूल व मॅगझिन जप्त करण्यात आले. संबंधित शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक १८७/२०२६ दाखल करण्यात आला.

पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर नथ्थू सपकाळे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर व त्यांच्या पथकाने कारवाई यशस्वी केली. आरोपीला रात्री ९:१३ वाजता अधिकृत अटक करण्यात आली.

भुसावळमध्ये गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह दोघे ताब्यात

दुसरी कारवाई भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली. १४ मे रोजी मध्यरात्री १२:१० वाजेच्या सुमारास शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या मागील मोकळ्या जागेत काही संशयित हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून असद अली शेख खालीद अली (वय १९, rा. आझाद नगर, बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) आणि मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल (मॅगझिनसह) आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button