
जळगाव : ग्राहकांना “एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही”, “No Return”, “No Exchange” अशा अटी लावून त्यांच्या कायदेशीर हक्कांवर मर्यादा आणणाऱ्या दुकानदारांविरोधात चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत. माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे तालुका सह संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
भगवान चौधरी यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत अनेक व्यापारी ग्राहकांच्या बिलांवर, पावत्यांवर किंवा दुकानांमध्ये “No Return–No Exchange” अशा सूचना लावून ग्राहकांचे कायदेशीर हक्क डावलत असल्याकडे लक्ष वेधले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ मधील कलम २(४७) नुसार ग्राहकांचे हक्क मर्यादित करणाऱ्या अटी या अन्यायकारक व्यापार पद्धती (Unfair Trade Practice) मध्ये मोडतात. त्यामुळे अशा अटी लावणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करता येऊ शकते.
विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना हा विषय जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेसमोर मांडण्याचे, व्यापारी संघटनांना ग्राहक संरक्षण कायद्याबाबत आवश्यक सूचना देण्याचे तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे ग्राहकांच्या हक्कांचे अधिक प्रभावी संरक्षण होण्यास मदत होणार असून, व्यापाऱ्यांमध्येही ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जागरूकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






