जळगावप्रशासकीय

कानळदा येथे सीईओ करिश्मा नायर यांची अचानक धडक; आरोग्य, शिक्षण व ग्रामविकास कामांचा घेतला आढावा

जळगाव, दि. २० एप्रिल २०२६  — जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवार (दि. २०) रोजी तालुक्यातील कानळदा गावास अचानक भेट देत प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयाची सखोल पाहणी केली. या भेटीत त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नायर यांनी जिल्ह्यातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी मोहीम सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून कानळदा येथे अचानक भेट देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तपासणी दरम्यान त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता, औषधसाठा, स्वच्छता आणि कर्मचारी उपस्थिती यांची पडताळणी केली. “ग्रामस्थांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत; यात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शैक्षणिक प्रगती, पोषण आहार, शैक्षणिक साहित्य व परिसरातील स्वच्छतेची माहिती घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत विविध योजनांची अंमलबजावणी, अभिलेख व नोंदवहीची तपासणी करण्यात आली. ग्रामविकासाच्या कामांना गती देण्याबाबत त्यांनी विशेष सूचना दिल्या.

दरम्यान, सीईओंच्या अचानक भेटीमुळे संबंधित विभागांमध्ये कार्यतत्परता वाढल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद प्रशासन नागरिकांना अधिक सक्षम व परिणामकारक सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश या दौऱ्यातून स्पष्ट झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button