जळगावशैक्षणिक

संगणकशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर नाहाटा महाविद्यालयात सलग बारावी राष्ट्रीय परिषद

भुसावळ : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातर्फे संगणक व माहिती तंत्रज्ञानातील आधुनिक विचारप्रवाह या विषयावर सलग बारावी एकदिवसीय राष्ट्रीय परिषद मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली. परिषदेत सुमारे ५२ संशोधक व प्राध्यापक तसेच ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

परिषदेचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांच्या हस्ते झाले. यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संजय इ. पाटे, उपप्राचार्य प्रो. डॉ. गजेंद्र आर. वाणी, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, परिषद संयोजक प्रा. डॉ. गौरी एम. पाटील व प्रा. डॉ. स्वाती पी. फालक, तसेच परिषद आयोजक प्रा. डॉ. हर्षल व्ही. पाटील उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी डॉ. मोहन फालक यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला (AI) घाबरून न जाता त्याच्याशी जुळवून घेणे आणि त्याचा योग्य व सर्जनशील वापर करणे हे विद्यार्थ्यांचे ध्येय असावे, असे सांगितले.

प्राचार्य प्रो. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी सांगितले की, पहिल्या राष्ट्रीय परिषदेत केवळ दोन ते तीन टक्के संशोधन अहवाल कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित होते. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानाच्या प्रवाहानुसार बाराव्या राष्ट्रीय परिषदेत जवळपास सर्वच संशोधन अहवाल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) या तंत्रज्ञानाशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.

परिषद तीन सत्रांत पार पडली. प्रथम सत्रात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संजय इ. पाटे यांचे ‘Research in Computer Science’ या विषयावर बीजभाषण झाले. संशोधन ही एखाद्या समस्या किंवा वास्तवाचा सखोल अभ्यास करून त्यावर नवीन व उपयुक्त उपाय शोधण्याची शास्त्रीय प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करत त्यांनी समस्या ओळखणे, पूर्वी झालेल्या संशोधनाचा अभ्यास करणे, त्यातील उणिवा शोधणे, नवीन पद्धती विकसित करणे आणि प्रयोगांद्वारे त्यांची पडताळणी करणे या संशोधन प्रक्रियेची माहिती दिली. संशोधनातून डेटासेट तयार करून प्रकाशित करता येतो, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान किंवा पद्धतीसाठी पेटंट मिळवता येते तसेच संशोधनाचे निष्कर्ष प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित करता येतात, असेही त्यांनी सांगितले.

द्वितीय सत्रात संशोधकांनी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने शोधनिबंधांचे वाचन व सादरीकरण केले. या सत्रात सेशन चेअर म्हणून प्रा. डॉ. वंदना चौधरी, उपप्राचार्य, श्रीमती जी. जी. खडसे कॉलेज, मुक्ताईनगर आणि प्रा. डॉ. प्रियंका बऱ्हाटे, डी.एन.सी.व्ही.पी. कॉलेज, जळगाव यांनी शोधनिबंधांचे परीक्षण केले.

तृतीय सत्रात निरोप समारंभ झाला. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बी. एच. बऱ्हाटे होते. सहभागी प्रा. डॉ. सचिन जोशी यांनी परिषदेचे आयोजन उत्कृष्टपणे करण्यात आल्याचे मत व्यक्त केले. तर विद्यार्थिनी तेजल बारी हिने परिषद विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधनासाठी मार्गदर्शक व उपयुक्त ठरल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी चौधरी यांनी केले.

परिषद प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रो. डॉ. गजेंद्र आर. वाणी, प्रा. डॉ. गौरी एम. पाटील व प्रा. डॉ. स्वाती पी. फालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आयोजन समितीचे सचिव प्रा. डॉ. हर्षल व्ही. पाटील यांच्या समन्वयाने संगणकशास्त्र विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button