
जळगाव – जिल्ह्यातील सर्व गोपनीय माहितीचे कामकाज पाहणाऱ्या अंमलदारांची आज जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विस्तृत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रत्येक पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या संवेदनशील गावांचा, संभाव्य जातीय तणावाचा तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.
यामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती, महाराणा प्रताप जयंती तसेच ईद या सणांच्या अनुषंगाने निघणाऱ्या मिरवणुका, विविध यात्रा, बदलती राजकीय समीकरणे, वाढते गुन्हे, इराणी गँग्सची हालचाल, ड्रॉप केसेस, पालख्या, गांजा लागवड, गोतस्करी, अवैध पुतळे आणि तडीपार गुन्हेगार यांसारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान अंमलदारांना संवेदनशीलतेने काम करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रभावी इंटेलिजेंस कसे मिळवावे, माहिती संकलनाच्या पद्धती कशा सुधाराव्यात यावर पोलीस स्टेशननिहाय मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस अधीक्षकांकडून (SP) थेट गोपनीय अंमलदारांशी संवाद साधण्याची ही बैठक आता नियमितपणे प्रत्येक महिन्याला आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
गोपनीय अंमलदार हे पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणालीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्यांच्याशी थेट संवाद साधणे, त्यांच्या कामाची दखल घेणे आणि त्यांचे कौतुक करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
इंटेलिजेंसचे प्रमुख प्रकार आणि उदाहरणे:
Human Intelligence (HUMINT): माहितीदार (इन्फॉर्मर्स)
Open-Source Intelligence (OSINT): वृत्तमाध्यमे, सार्वजनिक माहिती
Cyber Intelligence (CYBINT): सोशल मीडिया विश्लेषण
Community Intelligence: बीट पोलिसिंगमधून मिळणारी माहिती
Technical/Electronic Intelligence: कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR)
Forensic Intelligence: डिजिटल फॉरेन्सिक तपास
Criminal Intelligence (CRIMINT): गुन्हेगारी नोंदी व डेटाबेस
Surveillance-Based Intelligence: सीसीटीव्ही, फोन मॉनिटरिंग
या बैठकीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.






