
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील मेहरुण परिसरातील शिवाजी महाराज उद्यानाजवळ असलेली स्मशानभूमी अनेक वर्षांपासून भकास अवस्थेत असून तेथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे आगामी मनपा आर्थिक अंदाजपत्रकात स्मशानभूमीच्या सुशोभीकरण व विविध विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील भैय्या माळी व माजी नगरसेवक राजू भाऊ मोरे यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मेहरुण उद्यानालगत असलेल्या या स्मशानभूमीत शहरातील तांबापूर, इच्छादेवी, आदर्शनगर, महाबळ कॉलनी, सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी आदी विस्तारित भागातील नागरिक अंत्यसंस्कारासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी असलेले ओटे व त्यावरील लोखंडी पिंजरे जीर्ण अवस्थेत असून ओट्यांची संख्या देखील अपुरी आहे. त्यामुळे ओट्यांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अंधार असतो. त्यामुळे अधिक पथदिवे व मोठ्या प्रकाशाचे दिवे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय स्मशानभूमीला चारी बाजूंनी कंपाऊंड वॉल करून प्रवेशद्वारांवर गेट बसविणे, बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करणे, अंत्यसंस्कारावेळी मनपा निधीतून गौरी व लाकडाची व्यवस्था करणे, पावसाळ्यात सुमारे हजार नागरिक बसू शकतील असे मोठे शेड उभारणे तसेच महादेव मंदिराकडून येणाऱ्या जुन्या वहिवाट रस्त्याचे काँक्रिटीकरण करून पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी आर्थिक वर्षाच्या मनपा अंदाजपत्रकात मेहरुण स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करावी, अन्यथा महानगरपालिका समोर आंदोलन छेडण्याचा इशाराही माजी नगरसेवकांनी दिला आहे.






