
जळगाव – श्रीराम माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक सभा उत्साहपूर्ण व स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिवाकर जोशी होते.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. पन्नालाल लाडवंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष व संस्थेचे सचिव श्री. अशोकभाऊ लाडवंजारी, सौ. सरस्वती पाटील, श्री. भगवान लाडवंजारी, श्री. किरण सुपडू कोचुरे, सौ. ललिता पवार तसेच श्री. राजेश रामगिरवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन श्री. अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. दिवाकर जोशी यांनी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षिका सौ. प्रतिभा पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शालेय शिस्त आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील सहभागाबाबत मार्गदर्शन केले.
मान्यवरांनी पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, शाळेशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. पालकांनीही विविध सूचना मांडून विद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक केले. श्री. किरण सुपडू कोचुरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर संस्थेचे अध्यक्ष श्री. पन्नालाल लाडवंजारी यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत उपस्थित पालकांना श्री. अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या हस्ते वृक्षांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापकांनी वृक्षसंवर्धनाचा पर्यावरणपूरक संदेश दिला.
सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती पिंजारी मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील कु. आलिया राजू शेख व कु. कल्याणी कोचुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती पिंजारी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.






