जळगावसामाजिक

मुक्ताईनगर वन विभागातील वाहन हस्तांतरण प्रकरणाची चौकशीची मागणी; महेंद्र पाटील यांचा १७ जुलैला ‘ढोल बजाओ’ आंदोलनाचा इशारा

जळगाव, दि. १६ (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत राख चोरी प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे कथित बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचा आरोप करत राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष महेंद्र काशिनाथ पाटील यांनी संबंधित वन अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच या मागण्यांची पूर्तता न झाल्यास १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जळगाव येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पत्रकानुसार, योगेश नरहरी बुडूखले यांच्या मालकीची MH19EA8516, MH19EA8517 आणि MH19EA8518 ही तीन वाहने चोरीला गेल्यानंतर त्याबाबत भुसावळ न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान, ही वाहने मुक्ताईनगर वन विभागाने राख चोरी प्रकरणात जप्त केली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आणि मूळ मालकाला नोटीस न देता संबंधित वाहने अन्य व्यक्तींच्या ताब्यात देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे, वन अधिकारी अनिल साळुंखे, जळगांवचे एसीएफ चव्हाण यांच्यासह इतरांवर संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महेंद्र पाटील यांनी माहितीच्या अधिकारातून या प्रकरणाची माहिती मागवल्यानंतर आपल्याला आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा तसेच काही व्यक्तींनी वाहनावर हल्ला केल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडे ११२ क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली असली तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीने या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना निलंबित करणे, मूळ मालकाला वाहने परत मिळवून देणे तसेच महेंद्र पाटील व त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास १७ जुलै रोजी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर तीव्र ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महेंद्र पाटील यांनी दिला आहे. आंदोलनाची नोटीस जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हापेठ पोलीस ठाणे तसेच संबंधित वन अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button