
जळगाव, दि. 10 जून : जागतिक बालमजुरी विरोधी दिन (12 जून) निमित्त जळगाव जिल्हा पोलिस दलाने 8 जूनपासून बालमजुरी निर्मूलनासाठी विशेष शोध व बचाव मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेला प्रारंभीच यश मिळाले आहे. जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत बालमजुरीसंदर्भात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बालमजुरी ही केवळ कायद्याचे उल्लंघन नसून बालकांच्या शिक्षण, आरोग्य, विकास आणि सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकारांवर होणारा गंभीर आघात असल्याने जळगाव पोलिसांनी या सामाजिक समस्येविरुद्ध व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत हॉटेल्स, ढाबे, गॅरेज, कारखाने, स्क्रॅप युनिट्स, वीटभट्ट्या, रोडसाईड स्टॉल्स, बांधकाम साईट्स, धोकादायक उद्योग, डम्पिंग ग्राउंड, केमिकल युनिट्स, हीट बर्नर्स तसेच काच उद्योगांमध्ये गोपनीय पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे.
या कारवाईत सिव्हिल ड्रेसमधील पोलिस पथके, महिला अधिकारी, चाईल्ड वेल्फेअर ऑफिसर्स, महिला पंच तसेच मानव तस्करी विरोधी कक्षाच्या (AHTU) कर्मचाऱ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.
मोहिमेदरम्यान जळगाव तालुका पोलिसांनी दोन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हा क्रमांक 176/2026 मध्ये आरोपी अरबाज अजीज खाटीक याच्याविरुद्ध बीएनएस कलम 146, बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम कलम 3 आणि जुवेनाइल जस्टिस कायदा कलम 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने एका बालकाला गॅरेजमध्ये धोकादायक पद्धतीने कामावर ठेवले असल्याचा आरोप आहे.
तर गुन्हा क्रमांक 177/2026 मध्ये आरोपी भगवान पाटील याच्याविरुद्धही याच कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानेही एका बालकाकडून गॅरेजमध्ये धोकादायक स्वरूपाचे काम करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, 14 वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात रोजगार देणे हा गंभीर गुन्हा आहे, तर 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये कामास लावणे देखील कायद्याने प्रतिबंधित आहे. अशा प्रकरणांमध्ये जुवेनाइल जस्टिस कायदा, बाल कामगार कायदा तसेच आवश्यकतेनुसार भारतीय न्याय संहितेतील मानवी तस्करी, बेकायदेशीर कैद, मारहाण आणि अपहरणासारख्या गंभीर कलमांचाही वापर केला जाऊ शकतो.
जळगाव पोलिसांची ही मोहीम केवळ कायदेशीर कारवाईपुरती मर्यादित नसून बालकांना सुरक्षित, शिक्षणाभिमुख आणि सन्मानपूर्ण बालपण मिळवून देण्याच्या व्यापक उद्दिष्टाचा भाग असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.
बालमजुरीबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिस, बाल हेल्पलाईन 1098 किंवा संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिस दलाने केले आहे.
“ये दौलत भी ले लो,
ये शोहरत भी ले लो,
भले छीन लो मुझसे मेरी जवानी,
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन,
वो काग़ज़ की कश्ती, वो बारिश का पानी…”
बालपण हिरावून घेणाऱ्या बालमजुरीविरुद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची गरज असल्याचे या मोहिमेतून अधोरेखित झाले आहे.






