जळगावराजकारण

प्रभाग क्र. ३ च्या समस्यांवर महासभेत अर्चना पाटील आक्रमक; प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

जळगाव : महानगरपालिकेची दिनांक ९ जुलै २०२६ रोजी झालेली महासभा विविध विषयांनी गाजली. यावेळी नगरसेविका अर्चना पाटील यांनी प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात निर्माण होणारी बिकट परिस्थिती, आपत्कालीन यंत्रणेची कार्यक्षमता आणि वाढत्या लोकवस्तीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची गरज या विषयांवर त्यांनी सभागृहात ठामपणे आवाज उठविला.

प्रभाग क्र. ३ मधील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून पावसामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. याचे उदाहरण देताना त्यांनी एका दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला. एका मृत व्यक्तीच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने अंत्ययात्रा काढणेही अशक्यप्राय झाले होते. या गंभीर परिस्थितीची माहिती संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना वारंवार दूरध्वनीद्वारे देऊनही कोणतीही तातडीची कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी सभागृहात केला.

अखेरीस जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी मुरूम व भराव टाकण्यात आला. त्यानंतरच अंत्ययात्रा मार्गस्थ होऊ शकली, अशी माहिती अर्चना पाटील यांनी महासभेत दिली. अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेची तयारी नेमकी काय आहे, असा प्रश्नही उपस्थित केला. मुसळधार पाऊस, रस्त्यांवरील पाणी साचणे, नागरिकांना होणारा त्रास आणि तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहून त्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नव्याने रुजू झालेले आयुक्त आदित्य जीवने यांनी प्रभाग क्र. ३ ला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील रस्ते, नाल्यांची स्थिती, पावसाळ्यातील अडचणी आणि नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. प्रभागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता विद्यमान नागरी सुविधा अपुऱ्या पडत असून विकासकामांना गती देण्याची गरज असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी वारंवार संघर्ष करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष घालून रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर आवश्यक कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी करत अर्चना पाटील यांनी संबंधित विषयांवर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button