
जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. स्वायत्त कॉलेज), जळगाव येथील वाणिज्य मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे व व्याख्याते डॉ. निशांत घुगे यांचा महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. निशांत घुगे यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेपासूनच बचतीची सवय लावून घेत त्यातून योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. बचत आणि गुंतवणूक यातील फरक, गुंतवणूक म्हणजे काय, गुंतवणूक का करावी, तसेच तेजी आणि मंदीच्या काळात गुंतवणूक कशी करावी, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
बारावीनंतर गुंतवणूक क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परीक्षांची तयारी कशी करावी, त्यासाठी कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे, तसेच गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित कायदे व त्यातील तरतुदी याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संयम, सातत्य आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर गुंतवणूक क्षेत्रात निश्चितपणे चांगले करिअर घडविता येते, असे त्यांनी सांगितले.
व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे डॉ. घुगे यांनी समर्पक उत्तरे दिली. तसेच गुंतवणूक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शक्य ती मदत करण्याचे आश्वासन देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन होत्या. यावेळी पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य शाखांचे समन्वयक प्रा. उमेश पाटील, विज्ञान शाखा समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी तसेच वाणिज्य मंडळाच्या अध्यक्षा प्रा. ललिता इलको यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. निवेदिता जोशी यांनी करून दिला. आभारप्रदर्शन प्रा. दिनेश पांचपोळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. अर्चना जाधव, प्रा. प्रसाद देसाई, डॉ. जयंत इंगळे, प्रा. प्रविण महाजन, प्रा. स्वप्नील धांडे, प्रा. निवेदिता जोशी, प्रा. पूजा सायखेडे, प्रा. ज्योती चौधरी, प्रा. संदीप वानखेडे, प्रा. उमेश ठाकरे आणि श्री. विजय जावळे यांनी परिश्रम घेतले.






